
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रात पदव्युत्तर ब्रॉड स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या एकूण ७ हजार ६१५ जागा उपलब्ध झाल्या असून, देशातील आघाडीच्या दहा राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले आहे. गतवर्षीच्या ६ हजार ५४९ जागांच्या तुलनेत यंदा १ हजार ६६ जागांची म्हणजेच १६.३ टक्क्यांची निव्वळ वाढ झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
आजची वाढलेली पदव्युत्तर प्रवेशक्षमता ही उद्याच्या सक्षम आरोग्यव्यवस्थेचा पाया आहे. महाराष्ट्रात अधिक तज्ज्ञ डॉक्टर घडतील, वैद्यकीय संशोधनाला चालना मिळेल आणि शासकीय रुग्णालयांची उपचारक्षमता वाढेल. वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एम.डी. आणि एम.एस. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये २९ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एकूण ७२० जागांची निव्वळ वाढ झाली आहे. या वाढीमुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची प्रवेशक्षमता विस्तारली आहे.