
माण तालुक्यातील पिंपरी गावात आज एक आगळेवेगळे आणि माणुसकीचा संदेश देणारे चित्र पाहायला मिळाले. कोणताही औपचारिक मंच नाही, मानपानाचा बडेजाव नाही, तर शेतातील मातीवर अंथरलेल्या घोंगड्यावर पालकमंत्री शेतकऱ्यांसोबत बसले होते. सोबतीला गावातील शेतकरी, समोर दिवाळीचा फराळ आणि मनमोकळा संवाद! निमित्त होते दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्यासाठी आयोजित केलेल्या फराळाच्या कार्यक्रमाचे.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकट कितीही मोठे असले तरी खचून जाऊ नका, धीर सोडू नका, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.