
रामटेक तालुक्यातील कवडक येथे श्री दत्ता मेघे फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या स्व. दत्ता मेघे स्मृती दालन, नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह मेघे कुटुंबीय उपस्थित होते.
यंदा अल निनोचा प्रभाव आणि प्रतिकूल पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रत्यक्ष शेतीत उपयोग होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन महत्त्वाचे असून, देशी गोवंशाचे संवर्धन, आधुनिक पशुवैद्यकीय उपचार आणि संशोधनाच्या माध्यमातून पशुपालकांना सक्षम करण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मेघे फाऊंडेशनच्या या संस्थांमुळे ग्रामीण भागातील कृषी संशोधन, पशुसंवर्धन आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळून रामटेकच्या विकासाला हातभार लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
निसर्गासह आपण सर्व एकाच विश्वाचे घटक असून त्याचे मालक नाही, ही जाणीव ठेवून सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारी जीवनदृष्टी विकसित करणे आवश्यक आहे. जीवनात संयम राखून भारताने आपल्या विकासातून जगाच्या विकासाचा नवा मार्ग दाखवावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
विदर्भात दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देशी गोवंशाचे संवर्धन व दूध उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. मदर डेअरीच्या एक हजार कोटींच्या प्रकल्पासह शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे या क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
स्व. दत्ताभाऊ मेघे यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे नेत मेघे कुटुंबाने कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, या संस्थांमुळे रामटेकच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नेहरू बालसदनच्या चमूने महाराष्ट्र गीत सादर केले. सागर मेघे यांनी प्रास्ताविक केले, तर आमदार समीर मेघे यांनी आभार मानले.