
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे, सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांची तलवार यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करून, सर्व नियम आणि प्रक्रियांचे पालन करत महाराष्ट्रात परत आणणे हे आमचे कर्तव्यच होते. शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनाला भेट देऊन महाराष्ट्राचा हा जाज्वल्य इतिहास समजून घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांच्या तलवारीबाबतचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाच्या सहकार्याने परराष्ट्र मंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि भारतीय दूतावासाच्या आवश्यक परवानग्या तातडीने मिळविण्यात आल्या. योग्य मध्यस्थी आणि समन्वयातून ही तलवार महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मालकीची म्हणून सन्मानाने परत आणण्यात आली.

या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, रघुजीराजे भोसले यांची तलवार, सरसेनापती प्रतापराव गुजर यांची तलवार, खंडेराव गायकवाड यांची ढाल, सरदार रास्ते यांचा दांडपट्टा यांसह शिवकालीन आणि समकालीन अनेक ऐतिहासिक शस्त्रे पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. हे प्रदर्शन पुढील सहा महिने सर्वांसाठी खुले राहणार असून, मराठी बांधवांसह इतिहासप्रेमी आणि देशभक्त नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी केले.
कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक डॉ. सभ्यासाची मुखर्जी, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, उपसंचालक हेमंत दळवी, विश्वस्त सायरस गुजर आणि शाहीर नंदेश उमप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘दांडपट्टा’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.