
नवनिर्मित अंगणवाडी इमारती राज्यातील उत्कृष्ट इमारतींपैकी असून, त्यामध्ये बालकांच्या शिक्षण, पोषण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याने सुपोषणाच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले.
या आधुनिक अंगणवाड्यांमध्ये हवेशीर वर्गखोल्या, पूर्वप्राथमिक शिक्षण, पोषण आहार, सुसज्ज स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, खेळण्याच्या सुविधा आणि संरक्षक भिंतीची व्यवस्था करण्यात आली आहे. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत एकाच परिसरात असल्याने बालकांना सुरक्षित वातावरण मिळणार आहे. बालकांच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असल्याने गरोदर व स्तनदा मातांच्या पोषणाकडेही विशेष लक्ष देण्याचे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले. तसेच कुपोषणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य व महिला बालविकास विभागाने संयुक्त सर्वेक्षण केले असून, त्यानुसार प्रभावी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या स्वयंपाकघरातून सध्या दररोज सुमारे ५ हजार ८०० बालकांना दोन वेळचा आहार दिला जात असून, विस्तारीकरणानंतर डिसेंबरपासून दररोज २० ते २५ हजार बालकांना भोजन देण्याचे नियोजन आहे. या आधुनिक अंगणवाड्यांची माहिती केंद्र शासनाच्या अहवालात समाविष्ट करून जिल्ह्याचे काम देशपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री तटकरे यांनी नमूद केले.
मंत्री तटकरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व लेक लाडकी योजनेचे धनादेश तसेच बेबी केअर किटचे वितरणही करण्यात आले.
यावेळी आमदार राजेश पाडवी, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.