
प्रत्येक नागरिकापर्यंत सोपे आणि व्यवहार्य सुरक्षाविषयक संदेश पोहोचविणारी ही बहुघटक मोहीम कुटुंबे, व्यवसाय आणि समुदायांच्या सायबर सुरक्षेला बळकटी देईल. ही मोहीम देशातील सर्वांत व्यापक सायबर जनजागृती मोहिमांपैकी एक ठरेल. सायबर क्षेत्रातील सामूहिक प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासन उद्योग क्षेत्रासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे. सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नसून नागरिकांचा सजग सहभागही तितकाच आवश्यक आहे – मंत्री ॲड. आशिष शेलार
०००
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करणारे सायबर धोके वेगाने बदलत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी केवळ तांत्रिक संरक्षण पुरेसे नसून प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहणे आवश्यक आहे. ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’सारख्या मोहिमांमधून डिजिटल धोक्यांचे स्वरूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जात आहे. प्रत्येक नागरिकाने माहितीपूर्ण, सावध आणि सायबरदृष्ट्या सजग राहिल्यास अधिक सुरक्षित व सक्षम डिजिटल भारताच्या उभारणीत योगदान देता येईल – ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क विभाग
०००

यावेळी डीएससीआयचे संचालक सुकृत घोष, महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, बीएसई, सेबी, इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर यांच्यासह या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या १७ औद्योगिक भागीदार संस्थांतील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
⏺️ जगभरात सायबर सुरक्षा जनजागृती म्हणून पाळल्या जाणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात मोहिमेच्या शुभारंभानिमित्त बीएसईच्या पारंपरिक घंटानादाच्या धर्तीवर ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ हा प्रतीकात्मक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मोहिमेच्या ‘सायबर अँथम’चेही अनावरण झाले.
⏺️ भारतीय पारंपरिक कठपुतळी कथाकथन कलेचा डिजिटल युगासाठी वापर करून सायबर सुरक्षेचे संदेश सहज समजतील, अशी मोहिमेची रचना आहे. याद्वारे मोबाइल ॲप, ई-मेल, समाजमाध्यमे आणि डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षित सवयींबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल. एपीकेद्वारे होणारी फसवणूक, एआय व्हॉइस क्लोनिंग, रिअल टाइम डीपफेक, ‘डिजिटल अटक’, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फसवणूक आणि अन्य उदयोन्मुख धोक्यांची माहितीही दिली जाणार आहे.
⏺️ स्क्रीनसेव्हर्स मंच, पोस्टर चौपाल, माहितीचित्रे, सायबर कथा, स्टिकर्स आणि ‘सायबर पाठशाला की किताब’ अशा माध्यमांतून उपलब्ध करुन दिले जाणारे जनजागृती साहित्य https://www.dsci.in/cyber-security-awareness-month-2026/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
⏺️ या मोहिमेला इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In), केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C), केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, महाराष्ट्र शासन तसेच बीएसईसह विविध उद्योग भागीदारांचे सहकार्य लाभले.