
विद्यार्थी परिषद निवडणुकांशी संबंधित विविध बाबींचा सखोल अभ्यास करून शासनाला आवश्यक त्या उपाययोजना व शिफारशी सादर करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
समितीच्या अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, समितीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्यासह विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील तज्ज्ञांचा समावेश असून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
समितीमार्फत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांचा सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक, सुलभ आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना सुचविणे, निवडणूक प्रक्रियेतील विविध घटकांबाबत योग्य नियमावली निश्चित करणे आणि पुढील दिशा ठरविणे ही समितीची प्रमुख कार्ये आहेत.