
वडाळा येथील गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून २ हजार ८५० ते ३ हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे देण्यात येणार असून, कामगारांसाठी भविष्यात आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील सर्व ३६ माथाडी मंडळांचे सक्षमीकरण व पुनर्रचना करण्यात येणार असून, पारदर्शकतेसाठी स्वतंत्र पॅनेलमार्फत लेखापरीक्षण केले जाईल. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे व अपघात नुकसानभरपाईचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यात येतील. माथाडी कामगारांच्या नावावर कामगारांचे नुकसान करणाऱ्या अनधिकृत टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या पोत्यांबाबतच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वाशी एपीएमसी मार्केटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करून माथाडी कामगारांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच कामगारांच्या मुलांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व ‘सारथी’च्या माध्यमातून उच्च शिक्षण व कौशल्य विकासाच्या स्वतंत्र योजना राबविण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले
वनमंत्री गणेश नाईक यांनी माथाडी कामगारांच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीवर भर देत, पुढील पिढीने उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत प्रगती करावी, असे आवाहन केले. तसेच माथाडी रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि वडाळा गृहप्रकल्पाचे काम विनाविलंब पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकरी, माथाडी कामगार आणि व्यापारी हे कृषी बाजार व्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ असल्याचे सांगितले. वाशी एपीएमसी मार्केटचा अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येणार असून, ५० किलो वजनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार मनोज जामसुतकर, नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाता पाटील, डॉ. प्राची पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, माथाडी संघटनांचे पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते. गुणवंत माथाडी कामगारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.