
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात बहुआपत्तीप्रवण ठिकाणी चक्रीवादळाच्या अनुषंगाने यंत्रणांची तयारी आणि प्रतिसाद क्षमतेची पाहणी करण्यात आली. यामुळे विविध आपत्तींच्या काळात नागरिक, शासकीय मालमत्ता, पशुधन आणि संसाधनांचे अधिक प्रभावी संरक्षण करण्यासह समन्वित प्रतिसाद क्षमता वाढवून संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, आचरा, रेडी पोर्ट, श्रीरामवाडी, शेळपी, विजयदुर्ग आणि तांबळडेग येथे मुसळधार पाऊस, वादळी वारे, समुद्राची खळबळ, धूप, पूर, झाडे पडणे, विजेच्या खांबांचे नुकसान तसेच रस्ते व रेल्वे संपर्क खंडित होणे अशा विविध आपत्कालीन परिस्थिती कृत्रिमरीत्या निर्माण करण्यात आल्या. या तालमीत महसूल, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जलसंपदा, परिवहन व बंदरे, ग्रामविकास, नगरपंचायत, औद्योगिक महामंडळ, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मत्स्य विभाग आणि रेडी पोर्ट प्राधिकरणासह विविध विभागांनी सहभाग घेतला. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने विकसित केलेल्या जिओ-डिसिजन सपोर्ट सिस्टीम (Geo-DSS) आधारित वेब-अॅप्लिकेशनमुळे आपत्तीग्रस्त नागरिक, टीम कमांडर, प्रशासन आणि शासनाची डेटाआधारित निर्णय घेण्याची क्षमता अधिक बळकट झाली.
यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे कमांडंट आदित्य कुमार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे आदी उपस्थित होते.