
आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली उपचारपद्धती असून, शहरी तसेच ग्रामीण भागात आयुष चिकित्सा अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
आयुर्वेद दिन व सेवा संकल्प अभियानअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित कार्यक्रमात यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर उपस्थित होत्या. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘पारंपरिक खाद्य पाककृती’, तसेच ‘भविष्यासाठी आयुर्वेद’ आणि ‘वार्धक्य काळात आयुर्वेदाची साथ’ या हस्तपुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यात राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत २६१ आरोग्य संस्थांमध्ये आयुष सेवा दिली जात आहे. तसेच ३९० ठिकाणी आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून आयुष चिकित्सा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुष ग्राम, आयुष्मान आरोग्य मंदिर आणि योग दिनाच्या माध्यमातून आयुष चिकित्सा व निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यात येत असून, आगामी काळात आयुष संस्थांचे अधिक बळकटीकरण करण्यात येणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.