
आयुर्वेद ही केवळ रोगोपचाराची पद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा व्यापक ज्ञानस्रोत आहे. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर आयुर्वेदाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाने परस्परपूरक दृष्टिकोनातून कार्य करावे. आयुर्वेद शिक्षण, संशोधन व नवोन्मेषासाठी जागतिक दर्जाच्या संस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन सुविधा उभारण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या परिसंवादास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक, कार्यक्रमाध्यक्ष रणजित पुराणिक, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्यंकट गिते, विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे आदी उपस्थित होते.

आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा मार्ग आहे. दिनचर्या, ऋतुचर्या, योग्य आहार-विहार आणि योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधन व तंत्रज्ञानाशी जोडून देशातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
आयुर्वेद ही भारताची जगाला मिळालेली अमूल्य देणगी असून, पारंपरिक ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, प्रामाणिक पुरावे आणि क्लिनिकल डेटाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे आयुर्वेदाला देशाच्या तसेच जागतिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी स्थान मिळेल, असे ऊर्जा मंत्रालय व नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.