
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्याचे जतन व संवर्धन करणे आणि जागतिक स्तरावर त्याला स्थान मिळवून देणे, हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी नमूद केले.

‘लोककलेतील श्रीगणेश’ या संकल्पनेवरील ‘कस्टमाइज्ड माय स्टॅम्प’ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे कायमस्वरूपी स्मृतिचिन्ह ठरणार असून, त्यातून नव्या पिढीत फिलाटेलीची आवड निर्माण होण्यास मदत होईल, असे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये यांनी सांगितले.
गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती संकलन सुरू असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी सांगितले.