
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थी आणि शिल्पकारांनी साकारलेली १२ फूट उंचीची आकर्षक मोदकाची कलाकृती या चित्ररथाचे विशेष आकर्षण आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्य विभाग आणि eFlag corp pvt Ltd यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
सार्वजनिक गणेशोत्सवातून निर्माण होणारे सामाजिक अभिसरण, समाजातील एकोपा, उत्साह आणि ऊर्जा यांची जगाला ओळख व्हावी, तसेच बाप्पाचा उत्सव जागतिक स्तरावर पोहोचून त्याला जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, या उद्देशाने ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (bappa.org) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे ४० हजार गावांपर्यंत पोहोचून तेथील गणेशमूर्ती, गणेशोत्सवाच्या परंपरा आणि त्यांच्याशी जोडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कथा जगासमोर मांडण्यात येणार आहेत. देश-विदेशातील बाप्पाची विविध रूपे, गणेशभक्तांचे अनुभव तसेच काळानुरूप बदलत जाणाऱ्या गणेशभक्तीचे स्वरूप या डिजिटल मंचावर अनुभवता येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘बाप्पा डॉट ओआरजी’ हे व्यासपीठ घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवांशी जोडलेल्या ‘गणेशकथा’ एकत्रित करून त्या जगासमोर मांडणार आहे. गणेशोत्सवाच्या परंपरा, प्रथा, श्रद्धा आणि वैशिष्ट्यपूर्ण कहाण्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, eFlag Corp Pvt. Ltd.चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद आष्टेकर तसेच मुंबईकर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात श्रीपाद अष्टेकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकरीता ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.