
केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘नवीकरणीय ऊर्जा राज्य मूल्यांकन आराखड्या’अंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील राज्यांमध्ये महाराष्ट्राने गुजरातनंतर दुसरा क्रमांक मिळविला. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही घोषणा केली.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने मंत्रालयाने हा मूल्यांकन आराखडा विकसित केला आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेतील वाढ, धोरणात्मक व नियामक व्यवस्था, वीज ग्रिडची सज्जता, वीज वितरण कंपन्यांची कामगिरी आणि गुंतवणुकीसाठीचे वातावरण या निकषांवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले.