
या गृहपत्रिकेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या साहित्यिक अभिव्यक्तीला वाव देण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दीपावलीनिमित्त मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित काव्यसंध्या कार्यक्रमात केले.
शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लेखनाचे आणि साहित्याचे मनापासून स्वागत आहे. ‘आपलं मंत्रालय’ हे मासिक आपले आहे. ‘आपलं मंत्रालय’ हे केवळ एक मासिक नसून ते मंत्रालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे व्यासपीठ आहे. त्यामुळे या मासिकाशी सर्वांनी आपलेपणाने जोडले जावे, त्यात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या लेखनातून मासिक अधिक समृद्ध करावे, असे आवाहनही प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी यावेळी केले.

यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ होते आणि तिला विचारांची नवी दृष्टी मिळते, असे सांगितले. काव्यसंध्येत विविध कवींनी सामाजिक, सांस्कृतिक, मानवी नातेसंबंध आणि जीवनातील भावभावनांवर आधारित कविता सादर केल्या. यावेळी नामदेव कोळी यांच्या ‘वाघूर’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.