
शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी आर्थिक मदत, सवलती आणि योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत तत्परतेने पोहोचवावा. तसेच पशुधनासाठी चारा, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि शिल्लक पाण्याचे सिंचनासाठी नियोजन करावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.
मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी मंत्रालयातून बुलढाणा जिल्ह्याच्या दुष्काळ, पीक पाणी आणि उपाययोजनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, सिद्धार्थ खरात, मनोज कायंदे, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण, कृषी अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार २५६ शेतकऱ्यांना १४६३ कोटी रूपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करावीत. कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट वाढू नये, यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली बँकांनी करू नये, शिवाय कर्जवाटपाचे काम गतीने करावे, असेही निर्देशही मंत्री जाधव पाटील यांनी दिले.
बुलढाणा जिल्ह्यात सध्या ४ लाख ६१ हजार मेट्रीक टन चारा उत्पादन होणार असून हा चारा जानेवारीपर्यंत पुरेल. संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने नियोजन करावे. शेतकऱ्यांना चारा लागवड आणि चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित करावे. तसेच वनक्षेत्रात वणवे लागू नयेत, यासाठी वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देशही मंत्री जाधव पाटील यांनी दिले.
बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती बिकट आहे. धरणातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मंत्री सावकारे यांनी दिल्या.