
ठाणे : श्रावणातील लोकपरंपरा आणि पूर्वांचलच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला समर्पित कजरी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. अभियान सामाजिक-सांस्कृतिक संस्था व ठाणे कजरी परिवारतर्फे आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपच्या नगरसेविका अनिता राम ठाकूर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तर भाजपचे मुंबई उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या हस्ते स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर लोकगायिका संजोली पांडेय, सोनू सिंह सूरीला आणि दीपक सुहाना यांनी सुरेल कजरी गायनाने उपस्थितांची मने जिंकून संपूर्ण सभागृह श्रावणमय केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `एक भारत – श्रेष्ठ भारत’ अभियानाला समर्पित स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार पोलिस निरीक्षक द्वारका भागीरथी विश्वनाथ डोखे यांना पर्वतारोहण व राष्ट्रसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. या वेळी `जस्टिस फॉर घोडबंदर रोड’ जनआंदोलनाच्या संस्थापिका श्रीमती श्रद्धा राय यांना पत्रकारिता व जनहिताच्या प्रश्नांवरील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र गीताने करण्यात आला. तसेच भविष्यात सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा जपण्याचा निर्धार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आयोजक समितीचे सदस्य संतोष जायसवाल, रवी सिंह, राजू सिंह, अरविंद गिरी, जगदंबा मिश्रा, पंकज जैन, हिरा राय, रतन मिश्रा, जयसिंग ठाकूर, प्रकाश शुक्ला, आनंद दुबे, दिनेश सिंह आणि नागेंद्र मिश्रा, मनीषा सिंह, सिरजा जायसवाल, सोनम शर्मा, सुनीता गुप्ता आणि राजकुमारी जायसवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.