
या नियमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान नसल्याचे तपासणीत आढळेल, त्यांना नोटीस बजावून एक महिन्याच्या कालावधीत मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात येत आहे. या मुदतीत मराठी भाषेचे ज्ञान आत्मसात न केल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई महानगर क्षेत्रात झालेल्या तपासणीत ३,९९५ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आले आहे. या सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यातील उर्वरित आकडेवारीनुसार आतापर्यंत ४,२२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. तपासणीदरम्यान चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान तपासले जाईल. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांना सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार असली, तरी त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात विहित मुदतीनंतर बॅज निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.