
स्मारकाची उंची ४५० फूट (पदपीठ १०० फूट व पुतळ्याची उंची ३५० फूट असणार आहे). हे स्मारक देशासह जगभरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थळ ठरणार असल्याने त्याची उभारणी जागतिक दर्जाची असावी, यासाठी विशेष दक्षता घ्यावी. स्मारकाच्या कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने निर्धारित कालावधीत काम पूर्ण करावे, असे निर्देश मंत्री शिरसाट यांनी दिले.
यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि यंत्रसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी. कामाची गती कायम ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार २४ तास कामकाजाचे नियोजन करून विविध एजन्सींमध्ये समन्वय साधावा, तसेच वाढलेल्या कामाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे एमएमआरडीए प्राधिकरणाला निर्देश देण्यात आले.
स्मारक परिसर संपूर्ण हरितपरिसर म्हणून विकसित होणार असून, सभागृह, संशोधन केंद्र, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय व भूमिगत वाहनतळ अशा आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, सहसचिव बागुल, दूरदृश्य प्रणालीद्वारे अनिल सुतार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.