
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्याबाबत मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, संबंधित चालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्यात येईल. या कालावधीत चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठी भाषा शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
मुंबई आणि ठाणे परिसरातील वातावरण बिघडविण्याचा काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे सांगून मंत्री सरनाईक यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. रिक्षा-टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी आणि नेत्यांशी शासन सातत्याने संवाद साधत असून, त्यांच्या सूचनांचा विचार करून कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही, अशी शासनाची भूमिका असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.