
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील इतर भागांप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना थेट मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे 50 टक्केच पाऊस झाला असून, खरीप हंगामातील जवळपास सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. धानोरेसह बार्शी तालुक्याच्या या परिसरात सुमारे 90 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीकडे शासन गांभीर्याने लक्ष देत असून, शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल. मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘फ्लड डायव्हर्शन’च्या माध्यमातून उजनी धरणात पाणी आणण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेची मंजुरी मिळाली असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या माध्यमातून उजनीत पाणी आणल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांनाही त्याचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.