
त्यांनी खामगाव तालुक्यातील कलोरी तसेच मोताळा तालुक्यातील खडकी खामखेड, रोहिनखेड व टाकळी येथे शेतांच्या बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांनी सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. काही ठिकाणी १०० टक्के नुकसान होऊन शेंगांमध्ये दाणे भरले नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, कार्यवाही वेगाने सुरू आहे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक विमा व शासकीय मदतीबाबत शासन सकारात्मक असून योग्य ती मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

केंद्राच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’सह राज्य शासनाच्या विविध योजनांतून शेतकऱ्यांना मदत केली जात असून, केंद्राकडून राज्याला आवश्यक ती भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही आवश्यक मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.