
भाषा हे विवादाचे माध्यम नसून सुसंवाद, समन्वय आणि समाजाला जोडण्याचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले बदलत्या हवामानाचे परिणाम गेल्या काही वर्षांत अधिक प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी राज्य शासनासोबतच समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक आहे.
ऊर्जा क्षेत्रात स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यावर शासनाचा भर आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा वाटा वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हवामान बदलाचे परिणाम आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्यास पर्यावरणाशी संबंधित अनेक समस्या दूर करता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

जमिनीची उत्पादकता टिकविणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि जलप्रदूषण रोखणे ही आगामी काळातील महत्त्वाची आव्हाने आहेत. जलस्रोतांमध्ये प्रदूषित पाणी जाणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता आणि भौगोलिक स्थिती यामध्ये असलेला असमतोल दूर करण्यासाठी दीर्घकालीन जलव्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून दुष्काळग्रस्त भागांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांचे नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नियमानुसार केंद्र शासनाकडे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत (एनडीआरएफ) मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येतात. पात्र लाभार्थ्यांना मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येते.शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, वीज उपलब्धता आणि आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुशासन हे केवळ प्रशासनाच्या कार्यपद्धतीपुरते मर्यादित नसून नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा उपलब्ध करून देणे हा त्याचा महत्वाचा भाग आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम प्रशासन आणि दीर्घकालीन नियोजनाच्या माध्यमातून विकासाला गती देण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एन. एच. (नाना)पालकर लिखित ‘मॅन ऑफ दि मिलेनिया डॉ. हेडगेवार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘सुशासन संवाद : मुंबई संकल्प’ या कार्यक्रमाला अभिनेते व खासदार रवि किशन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली.