
भगवान महावीरांनी दिलेली सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्याची शिकवण ही केवळ धार्मिक तत्त्वे नसून शांततापूर्ण, न्यायपूर्ण आणि मानवी समाजाच्या निर्मितीचा आधार आहे. आज जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाचा सामना करीत असताना भगवान महावीरांचा अहिंसा, क्षमा आणि मैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे. क्षमापना आणि विश्व मैत्रीचा संदेश हा केवळ एका धर्म किंवा समाजापुरता मर्यादित न राहता संपूर्ण मानवतेचा उत्सव बनावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.

समाजसेवा, उद्योग आणि जनकल्याणाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल जैन समाज रत्न पुरस्काराने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आमदार पराग शाह, सुखराज नाहर, कैलाशचंद जैन आणि सुरेश गोयल यांचा सन्मान करण्यात आला. राज्यपालांनी सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यातून समाजातील इतरांनाही सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार पराग शाह, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ख्यालीलाल तातेड, शिवलाल पोखरणा, जैन मुनी मुनिराज मुक्त निलय विजय, आचार्य साध्वी श्री योगक्षेम प्रभा, राष्ट्रसंत गुरुदेव श्री नम्रमुनी तसेच विविध जैन संप्रदायांचे आचार्य, संत, मुनी आणि साध्वी उपस्थित होते.