
नवी मुंबई महानगरपालिकेने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, विटा आणि पाचगणी या शहरांनीही विविध लोकसंख्या गटांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच रत्नागिरी नगरपरिषदेने स्वच्छ तटीय शहरांच्या श्रेणीत तृतीय क्रमांक, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने राज्यातील प्रथम स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला आहे.
विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल, राज्यमंत्री तोखन साहू, सचिव सत्येंद्र सिंह यांच्यासह देशभरातील महापौर, महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणींतील विजेत्या शहरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.