
नागपूर येथील जिल्हा वकील संघटनेचा पदग्रहण सोहळा आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
जिल्हा वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन श्री. फडणवीस म्हणाले, न्यायव्यवस्थेत आमुलाग्र बदल झाला असून तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांचा न्यायदानाच्या प्रक्रियेवरील विश्वास दृढ करण्याचा व वेगाने न्याय मिळावा ही सामान्यांची अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. नागपूरच्या बार असोसिएशनचीच परंपरा अतिशय गौरवशाली आहे, असे ते म्हणाले.

येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर, विधि व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नागपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जायसवाल, सचिव अनिल गुल्हाने, संघटनेचे माजी अध्यक्ष रोशन बागडे, माजी सचिव मनिष रणदिवे आदी यावेळी उपस्थित होते.