
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.
विशेषतः स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाची निगा राखण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे कक्ष उभारण्यात येणार आहेत. टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर निधीतून राज्यातील एसटी बसस्थानकांवर अंदाजे ३ मीटर × ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड कक्ष उभारले जाणार असून, त्यामध्ये आवश्यक फर्निचर, विद्युतीकरण आणि इलेक्ट्रॉनिक सुविधांचा समावेश असेल.
करारानुसार तीन आर्थिक वर्षांत १२५ कक्ष उभारण्यात येणार आहेत. यामध्ये २०२६-२७ मध्ये ५०, २०२७-२८ मध्ये ५० आणि २०२८-२९ मध्ये २५ कक्ष उभारण्याचे नियोजन आहे. उपलब्ध जागा, स्थानिक गरज आणि सीएसआर धोरणानुसार संख्येत आवश्यक बदल करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून आवश्यक जागा, वीज, पाणी व स्थापनेसाठी सहकार्य तसेच शासकीय परवानग्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कक्ष हस्तांतरित झाल्यानंतर त्यांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी एसटी महामंडळाची राहणार असून, एसटीकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही.
हिरकणीकक्ष हा केवळ सुविधा प्रकल्प नसून मातृत्वाचा सन्मान, महिलांच्या गरजांची जाणीव आणि प्रवासी-केंद्रित एसटी व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले संवेदनशील पाऊल असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.