
वसतिगृहांच्या इमारती, खोल्यांची रचना आणि सुविधांसाठी चार पर्यायी आराखडे तयार करून संबंधित जिल्ह्यातील जागेच्या उपलब्धतेनुसार बांधकाम करावे, असे निर्देश ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालयात महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. इतर मागास बहुजन कल्याण विभागाला वसतिगृहे आणि कार्यालयांच्या बांधकामासाठी एक रुपया नाममात्र दराने जागा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीचा उपसमितीने आढावा घेतला. महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. उपसमितीने ‘महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी’ या विशेष बोधचिन्हाच्या संकल्पनेची निवड केली. महाज्योतीने दुष्काळ निवारणाशी संबंधित कार्यक्रम तयार करून समितीसमोर सादर करावा, तसेच महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याच्या प्रती छापून वितरणासाठी उपलब्ध कराव्यात, असे निर्देश उपसमितीने दिले.
यावेळी उपसमितीचे सदस्य तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वन मंत्री गणेश नाईक, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, विभागाच्या संचालिका सोनाली मुळे तसेच नियोजन, नगर विकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि दुग्धविकास विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.