
भारत-जर्मनी आर्थिक संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवत जर्मन उद्योगांनी राज्यात गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन वाढवावे. महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक आणि तरुणांशी भागीदारी करून महाराष्ट्रातून भारतासह संपूर्ण जगासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जर्मनीचे भारत व भूतानमधील राजदूत डॉ. जास्पर विक, जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेलेना मेल्निकोव्ह, आयजीसीसीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष रिन्सी सूद, महासंचालक यान नोएदर तसेच उद्योग, व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ही ७० वर्षांची वाटचाल विश्वास, सातत्य आणि भागीदारीची प्रदीर्घ परंपरा आहे. या निमित्ताने या भागीदारीला भविष्यातील विकासाची नवी दिशा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही भागीदारी लोकशाही, तंत्रज्ञान, नवोन्मेष, कौशल्य, संशोधन, शाश्वत विकास आणि परस्पर विश्वास या आधारस्तंभांवर उभी आहे. महाराष्ट्रात इंडो-जर्मन उद्योगांची पुढील पिढी निर्माण झाली पाहिजे. संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान विकास, उत्पादन आणि नवोन्मेषाला चालना देऊन दीर्घकालीन भागीदारी उभी करण्याची गरज आहे. जर्मनीचे अचूक अभियांत्रिकी, स्वयंचलित यंत्रणा व स्मार्ट उत्पादनाचे कौशल्य महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमता व कुशल मनुष्यबळाशी जोडणे, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटलायझेशन व उदयोन्मुख तंत्रज्ञान, हरित तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, जैवप्लास्टिक व शाश्वत वाहतूक, कृषी, कृषी प्रक्रिया व कृषी तंत्रज्ञान, तसेच कौशल्य विकास, संशोधन व विकास आणि लोकांमधील परस्पर संबंध अधिक मजबूत करणे महत्त्वाचे आहे. सरकार गुंतवणुकीतील अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य करेल. जर्मन कृषी उद्योगासाठी महाराष्ट्राची दारे खुली आहेत. महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य असून फलोत्पादन, द्राक्षे, कांदा, ऊस, दुग्धव्यवसाय, अन्नप्रक्रिया आणि कृषी निर्यात क्षेत्रात राज्याची मोठी क्षमता आहे. कृषी उत्पादनांच्या केवळ विक्रीपेक्षा उच्च मूल्य असलेली कृषी पुरवठा साखळी विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे. यासाठी कृषी यांत्रिकीकरण, काढणीनंतरचे व्यवस्थापन, शीतसाखळी, अचूक शेती, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक, दुग्ध तंत्रज्ञान आणि डिजिटल कृषी या क्षेत्रांत जर्मन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येऊ शकतो – मंत्री जयकुमार रावल