
सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध सेवा विषयक मागण्यांबाबत आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीस आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. संजय काटकर, मॅग्मो संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. संदिप गेडाम, कार्यकारी अध्यक्ष मनोज खोमणे आदि सदस्य उपस्थित होते.
विभागीय उपसंचालकांनी प्रत्येक प्रकरणाचा नियमित आढावा घेऊन वैद्यकीय अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके निकाली काढावीत. देय असलेली रक्कम तातडीने अदा करावी. तसेच मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेला खासगी प्रॅक्टिस न केल्याबद्दलचा भत्ता लवकरात लवकर वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री आबिटकर यांनी दिल्या.
दीर्घकाळ सेवा करूनही वैद्यकीय अधिकारी म्हणूनच निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीची न्याय्य संधी मिळणे आवश्यक आहे. यासाठी पात्रता, अनुभव, कार्यक्षमता आणि प्रशासकीय गरज यांचा समतोल साधणारी पारदर्शक कार्यपद्धती तयार करावी. सर्व आस्थापना विषयक प्रश्नांवर संघटनेच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेऊन तोडगा काढावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.