
वाढवण बंदराच्या निकटतेचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील शेतमाल जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमपणे पोहोचविण्यासाठी दापचरी कृषी बाजाराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारव्यवस्थेशी जोडण्याचे नियोजन असून, प्रकल्पाच्या उभारणीसाठी गतीने नियोजन करण्याचे निर्देश मंत्री रावल यांनी दिले.
सुमारे १,४०० एकर परिसरात विकसित होणाऱ्या या प्रकल्पात शेतमालाची खरेदी-विक्री, प्रतवारी, पॅकेजिंग, शीतसाखळी, साठवणूक, गुणवत्ता तपासणी, ई-लिलाव, कंटेनर वाहतूक आणि निर्यात सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे काढणीनंतरच्या व्यवस्थापनात सुधारणा होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या गुणवत्तेनुसार अधिक चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे.
वाढवण डीपवॉटर पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे संपर्काशी दापचरी बाजाराची जोडणी होणार असून, यामुळे कृषी उत्पादनांची निर्यात अधिक वेगवान व किफायतशीर होण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजारव्यवस्थेच्या धर्तीवर दापचरी येथे जागतिक दर्जाचे ‘फूड हब’ विकसित करण्यात येणार असून, त्यातून कृषी मालाचे मूल्यवर्धन, निर्यातवाढ आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.