
राज्यातील शेती व जलव्यवस्थेसाठी अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, जलव्यवस्थापन व सिंचन क्षेत्रात उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. जलसंपदा विभागातील पुरस्कारांची संख्या वाढवून पुढील वर्षापासून प्रत्येक महामंडळासाठी तीन ते पाच पुरस्कार देण्यास मान्यता देत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी जलसंपदा विभागातील सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले.
जलसंपदा विभागातील अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जलविकासाला मोठी चालना मिळाली आहे. धरणे बांधण्यासोबतच त्यातील पाणी शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचविणे आणि प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. पाइपद्वारे वितरण प्रणाली, ठिबक व तुषार सिंचनाचा प्रभावी वापर, धरणांतील गाळ काढणे, पाण्याचा पुनर्वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

जलप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी भूसंपादन, वन व पर्यावरण मंजुरी आणि पुनर्वसनाच्या बाबींचे बांधकामासोबत समन्वयाने नियोजन करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले. तसेच ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन, सिंचन क्षेत्रवाढ आणि लोकसहभागासाठी नियोजन करण्यावर भर देत, तांत्रिक मनुष्यबळाला प्रोत्साहन देण्यासाठी अभियंता पुरस्कारांची संख्या वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली. तसेच ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2024’मध्ये महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.