
या अभियानांतर्गत राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारण्यात येणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित होते.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांना दीर्घकालीन संपर्क सुविधा देण्यासोबतच मोबाईल ॲपद्वारे थेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे चार लाख शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल नेटवर्क ‘इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’ (IWMS) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून रस्त्यांचे भौगोलिक स्थान सार्वजनिक पोर्टलवर पाहता येणार असून, प्रकल्प निर्मितीपासून कार्यादेश, ई-मेजरमेंट बुक आणि ई-बिलिंगपर्यंतच्या प्रक्रियेचे डिजिटल व्यवस्थापन केले जाणार आहे.
सेवा सप्ताहादरम्यान ग्रामसभांच्या माध्यमातून जनजागृती, प्राधान्य रस्त्यांची निवड, विनाशुल्क सीमांकन व अतिक्रमणमुक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमधून अंदाजे ५० हजार रस्ते IWMS प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
याचवेळी शेतकरी तक्रार व अभिप्राय मोबाईल ॲपचा शुभारंभ करण्यात आला. या ॲपद्वारे शेतकरी फोटो, व्हिडिओ आणि GPS स्थानासह तक्रारी व अभिप्राय थेट नोंदवू शकणार आहेत. शेतमाल, बियाणे, खते व कृषी यंत्रसामग्री शेतापर्यंत पोहोचविण्याची दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ व किफायतशीर करण्यासोबतच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करून शेतकऱ्यांच्या संपर्काच्या समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे.