
यावेळी अवादा उद्योग समूहाचे संस्थापक व अध्यक्ष विनीत मित्तल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. तसेच राज्यातील पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि मुंबईच्या भविष्यातील बदलांवर मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांसोबत संवाद साधला.
देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम नागपूर येथे आकार घेत आहे. येत्या दहा वर्षात नागपूर हे ‘सोलर इकोसिस्टीम’चे हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

देशातील पहिले सोलर मॉडेल अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात तयार होत असून अवदासमूहाला त्यांच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली 250 एकर जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी अधिग्रहित केलेली जमीन संपली असून तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत तयार करावयाची आहे, तसेच वर्धा जिल्ह्यातील नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

स्टील उद्योगांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योजकांना स्वस्त वीज कशी उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू असून 2029 पर्यंत उद्योगांना स्वस्त वीज मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सोलर बॅटरी स्टोरेजच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून 24 तास ऊर्जा उपलब्ध होईल यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना विजेचा प्रश्न राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.