
भाऊचा धक्का ते दिवेआगार प्रस्तावित रो रो सेवेबाबत, बागमांडला जेट्टी येथील वाहनतळाच्या पार्किंगबाबत, मौजे कारविणे येथील श्रीकृष्ण जेट्टीची दुरूस्ती व जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत, दिवेआगार जेट्टीबाबत, आरावी समुद्रकिनारी सुशोभीकरण, मुळगांव बंधारा लगतच्या जमिनीच्या महाराष्ट्र सागरी मंडळाची मालकी करण्याबाबत मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी पर्यटन व विकासाच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
आरावी समुद्रकिनारा गेल्या दीड-दोन वर्षांत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असून पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरणाची कामे होणे गरजेचे असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केले. पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेता अनधिकृत स्वरूपात स्टॉल किंवा झोपड्या उभारल्या जाण्याची शक्यता असून त्यापूर्वीच नियोजनबद्ध पद्धतीने समुद्रकिनाऱ्याचा विकास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.