
‘व्ही. बी.-जी. राम जी’ अंतर्गत मागेल त्याला तातडीने काम उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत युद्धपातळीवर कार्यवाही करावी. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करून रोजगार निर्मिती, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आढावा बैठकीत दिले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत गावपातळीवर मागणीप्रमाणे तातडीने कामे उपलब्ध करून देण्यात यावीत. जॉबकार्डनुसार केलेल्या कामांचे वेतन महाडीबीटी अंतर्गत तातडीने मजुरांना देण्यास प्राधान्य देण्यात यावे. मजुरांची नोंदणी तसेच कामांची मागणी याबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. दुष्काळग्रस्त गावे आणि रोजगाराची जास्त मागणी असलेल्या गावांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. मजूरप्रधान कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करून ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना यावेळी मंत्री गोगावले यांनी दिल्या.