
पर्यावरणाचा समतोल राखणे आणि प्लास्टिकचा वाढता प्रभाव रोखणे, ही काळाची गरज बनली असून ‘ग्लोबल वॉर्मिंग’ थांबवण्यासाठी सर्वांच्या एकत्र येण्याची आवश्यकता आहे. प्लास्टिक अमर असले तरी त्याचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहेत. या पार्श्वभूमीवर, शासनाचा एकही रुपया खर्च न करता स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) मदतीने प्लास्टिक पुनर्रक्रियेचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील १३ ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या ‘महा आर-पेट’ या अभियानाची सुरुवात ठाण्यातून होत असून, असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. पर्यावरण विभागातर्फे फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. ‘एक बॉटल पर्यावरण के नाम’ असे म्हणत प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे – मंत्री पंकजा मुंडे

हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस कंपनी, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, कोका कोलाचे क्लस्टर हेड के.के. जोसेफ, सिनेकलाकार प्रसाद ओक, डिनो जोसेफ, शिवानी सुर्वे, अमित रेयॉन आदी उपस्थित होते.