
याअंतर्गत राज्यातील विविध शासकीय आयटीआय व शासकीय तंत्रनिकेतनांमधील १,३९९ युवकांना १६५ तासांहून अधिक काळ रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये संस्थेच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचाही समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर मधील शासकीय आयटीआयमधील ३२६ युवकांना याचा सर्वाधिक लाभ झाला आहे. इन्फोसिस एक्समोबील अशा कंपन्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम व्यापक स्तरावर राबविणे शक्य होत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या उपक्रमात प्रामुख्याने रोजगारक्षम कौशल्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण संबंधित आयटीआय व संस्थांकडून दिले जात असल्याने ‘उन्नती’कडून संवादकौशल्य, कार्यस्थळावरील आवश्यक कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, रोजगारासाठीची तयारी आदी रोजगारक्षम कौशल्यांच्या विकासावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील विविध आयटीआयमध्ये हा उपक्रम अधिक व्यापक करून २० हजारांहून अधिक युवकांना रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ‘उन्नती’ने ठेवले आहे.