
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी दूर करणे आणि येथील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावले उचलली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी एम-६० हार्डनरचा वापर करून खड्डे बुजवण्याचे काम आणि पावसाने खराब झालेल्या रस्त्यांवर थेट कास्टिंग केलेले पॅचेस बसवण्याच्या कामाची पाहणी केली.

चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा मोठा फटका उद्योजकांना बसत आहे. जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आणि एम-६ आरएमसी विथ हार्डनरचा वापर केला जात आहे. सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी प्री-कास्ट पॅनेल ट्रेलरद्वारे आणून थेट बसवण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापण्यात आली आहे. रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट्ससह पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल. चाकणमध्ये येणाऱ्या वाहनांची ये-जा सुलभ होण्यासाठी तळेगाव ते शिक्रापूर या ५४ किलोमीटर मार्गाची दुरुस्ती, नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता आणि अंतर्गत रस्ते बांधणीला गती दिली जाईल. औद्योगिक क्षेत्रात क्लस्टरच्या माध्यमातून कामगार वसाहती (टाउनशिप) उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. निगडी ते चाकण, चाकण ते राजगुरुनगर आणि तळेगाव ते शिक्रापूर या मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महामेट्रो प्राधिकरणाला दिले आहेत. उद्योजकांच्या समस्यांच्या त्वरित निराकरणासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते व अन्य अधिकारी आठवड्यातून एक दिवस प्रत्यक्ष उपलब्ध राहतील. उद्योजकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी ‘मैत्री’ ॲपचा अधिकाधिक वापर करावा. शासनाच्या या सर्व उपाययोजनांमुळे उद्योजकांच्या समस्यांचे निवारण होऊन त्यांचे समाधान झाले असून, उद्योजकांनी आपले उद्योग बाहेर नेण्याबाबतचे मतपरिवर्तन झाले आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.