
तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि डॉ.राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी चित्रनगरी विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कलात्मक दृष्ट्या देशातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश होतो, असे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत. देशातील सर्वोत्तम रंगभूमी म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिले जाते. मराठी कलावंतांनी रंगभूमीची परंपरा आणि प्रतिष्ठा आजही जपली आहे. याच समृद्ध परंपरेच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टी सातत्याने पुढे जात आहे.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन खान, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राची आणि मुंबईची ओळख चित्रपट नगरी म्हणूनही जगभरात आहे. मराठी तसेच अन्य चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राने चित्रपटसृष्टीला समृद्ध परंपरा दिली आहे. या परंपरेला पुढे नेत चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. मुंबईतील फिल्म सिटी, एन. डी. स्टुडिओ, कोल्हापूरमधील चित्रिकरण सुविधा यांसोबतच आता रामटेक आणि नाशिक येथे नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेने राज्य शासन काम करत आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.