
राज्यातील युवकांच्या नेतृत्वगुणांना, नवोन्मेषी विचारांना आणि राष्ट्रनिर्माणातील सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम युवकांना स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत आपले विचार प्रभावीपणे मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. निवड झालेल्या युवकांना नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपल्या कल्पना सादर करण्याची तसेच विकसितभारत @२०४७ च्या उभारणीत थेट योगदान देण्याची संधी मिळणार आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला माय भारत, महाराष्ट्रचे राज्य संचालक अमित पुंडे, माय भारत, मुंबईचे उपसंचालक अनुप इंगोले तसेच राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य समन्वयक मिलिंद काळे उपस्थित होते. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून इच्छुक युवकांनी https://mybharat.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.