
जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केलेले नियोजन उत्कृष्ट असल्याचे नमूद करत पथकाने पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.
केंद्रीय पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी करीत आहेत. पथकामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहाय्यक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसान, फळपिकांवरील दुष्काळाचा परिणाम, मागील पाच वर्षांतील भूजल पातळी आणि उजनीसह मध्यम व लघुप्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठ्याचाही पथकाने आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत विकसित भारत-रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीव्हीजी रामजी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्याबाबतही पथकाने सूचित केले. जिल्ह्यातील ११६ गावांना १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पथकाला देण्यात आली. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत या गावांतील पाणीपुरवठा योजनांपैकी किती योजना पूर्ण झाल्या आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे आणि पाण्याचे स्रोत कोणते आहेत, याची माहिती पथकाने जाणून घेतली.
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व अधिकारी व यंत्रणांनी समर्पित भावनेने आणि संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश दिले. बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन तसेच संबंधित जिल्हास्तरीय विभागप्रमुख उपस्थित होते.