
पुणे येथे महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बैठक झाली.
बलुतेदार सहकारी संस्था या मंडळाच्या कार्याचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, आर्थिक विकासापासून वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन साठे यांनी केले.
माजी विधान परिषद सभापती वि. स. पागे यांच्या पुढाकारातून १९७२ पासून कारागीर रोजगार हमी योजनेद्वारे तालुका व ग्रामीण स्तरावर कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संस्थांचे कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या सद्यःस्थितीची, अडचणींची आणि आवश्यक सहकार्याची माहिती मंडळाकडे सादर करण्याचे निर्देशही साठे यांनी दिले.
विशेष घटक योजना आणि मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेच्या माध्यमातून संस्थांना सक्षम करण्यावर भर देण्यात येईल, असे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांनी सांगितले. संस्थांच्या समस्या शासनस्तरावर मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी उद्योग पर्यवेक्षकांना आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत राज्यातील बलुतेदार सहकारी संस्थांच्या अडचणी आणि विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. बैठकीस मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग, हातकागद विभागाचे अमर राऊत तसेच महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.