
विद्यापीठातून भविष्यातील उद्योग, नवोन्मेष आणि युनिकॉर्न निर्माण व्हावेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समुळे रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत आहेत. येत्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या स्वरूपात बदल होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे कौशल्याधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. नाशिक उपकेंद्रामध्ये डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थकेअर आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक विषयांवर लक्ष केंद्रित करावे.

नाशिकच्या विकासाचा उल्लेख करतांना श्री. फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये कृषी व विशेषतः द्राक्ष उत्पादन आणि निर्यात, अन्नप्रक्रिया उद्योग, अभियांत्रिकी सेवा, एरोनॉटिक्स, फार्मास्युटिकल्स, लाइफ सायन्सेस आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये विविध क्षेत्रांतील उत्पादन व औद्योगिक क्षेत्रात सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गेल्या काही वर्षांत नाशिकच्या विविध क्षमता विकसित करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांमुळे नाशिक पुन्हा एकदा वेगाने विकसित होत आहे. पुढील पाच वर्षांत मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून नाशिक उदयास येईल.
नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून या भागात दर्जेदार आणि रोजगारक्षम मानव संसाधन निर्माण होण्यास मदत होईल. आधुनिक शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देत नाशिकच्या विकासाला हे उपकेंद्र नवी दिशा देईल. तसेच येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञान, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्रभावी वापर कसा करता येईल, यासाठीही प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, खासदार भास्कर भगरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.