
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई आणि सिडको यांच्यात खारघर, नवी मुंबई येथे ‘प्रपोज आर्ट डिस्ट्रिक्ट’ विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या मुंबईच्या संचालक निधी चौधरी आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांनी या सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अखत्यारितील स्मारकांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांच्यात दुसरा सामंजस्य करार झाला. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ.तेजस गर्गे आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण पश्चिम विभागाच्या प्रादेशिक संचालक टी. श्रीलक्ष्मी यांनी या कराराची देवाणघेवाण केली.
विकासाच्या विविध क्षेत्रांत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून जीडीपी, जीएसटी संकलन, परकीय थेट गुंतवणूक, निर्यात यासह डेटा सेंटर क्षेत्रातही राज्याची भरीव कामगिरी आहे. देशातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात असून मुंबई ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर’ची राजधानी म्हणून उदयास येत आहे. मुंबईतील मेट्रो, कोस्टल रोड, उड्डाणपूल, एलिव्हेटेड कॉरिडॉर तसेच विविध वाहतूक प्रकल्पांमुळे शहरातील गतिशीलता मोठ्या प्रमाणात सुधारत आहे, असे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.
या कराराच्या वेळी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि एन.जी.एम.ए., मुंबईच्या संचालक निधी चौधरी, केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जेजे स्कूल ऑफ आर्टचे कलाकार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा आणि स्मारकांच्या संवर्धनासाठी केंद्र व राज्य शासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असून, भागीदारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संसाधने उपलब्ध करून देता येतील, असे प्रतिपादन केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी केले.

महाराष्ट्रातील सुमारे ४० प्रमुख स्मारकांसाठी साइट मॅनेजमेंट प्लॅन, डीपीआर आणि कार्यआराखडा तयार करण्यात आला असून, केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त संसाधनातून या स्मारकांच्या संवर्धनासह पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.