
मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या अथक परिश्रमामुळे मराठी चित्रपट आज जागतिक व्यासपीठावर पोहोचला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचा झेंडा देशाच्या राजधानीतही दिमाखाने फडकत आहे, असे गौरवोद्गार मंत्री सामंत यांनी यावेळी काढले.
महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरा दिल्लीकरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. दिल्लीत भव्य स्वरूपात गणेशोत्सवाचे आयोजन करावा. मराठी चित्रपट केवळ मुंबई, पुण्यापुरता मर्यादित न ठेवता देशातील विविध भागांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून विशेषतः तंजावर आणि बडोदा अशा मराठी संस्कृतीशी ऐतिहासिक नाते असलेल्या शहरांमध्येही मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यावर भर द्यावा – मंत्री सामंत

यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांच्यासह ‘देऊळ बंद २’ चे दिग्दर्शक प्रवीण तरडे, सत्यशोधक चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर यांची विशेष उपस्थिती होती.
दरम्यान, या चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता. यादरम्यान ‘तुंबाडची मंजुळा’, ‘घुबाड कुंड’, ‘स्थळ’ आणि ‘फुलवंती’ हे दर्जेदार मराठी चित्रपट रसिकांसाठी दाखवण्यात आले. सकाळच्या संत्रात फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रा. मिलिंद दामले यांनी चित्रपट अभ्यासकांचे विशेष सत्र घेतले. त्यात काही महत्त्वपूर्ण माहितीपटांचे प्रसारण करण्यात आले.