
जपानी कंपन्यांनी महाराष्ट्राकडे केवळ गुंतवणुकीचे केंद्र म्हणून न पाहता, भारतासह जागतिक बाजारपेठेतील विस्तारासाठी धोरणात्मक भागीदार आणि सक्षम लॉजिस्टिक्स हब म्हणून पाहावे, असे त्यांनी सांगितले.
वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड येथे निक्केई एशिया आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘निक्केई इंडिया-जपान इकॉनॉमी अँड इन्व्हेस्टमेंट फोरम’चे आयोजन करण्यात आले होते.
भारत – जपान संबंध परस्पर विश्वास, आदर आणि समान मूल्यांवर आधारित असून, उत्पादन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, पुरवठा साखळी आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात सहकार्याची मोठी संधी आहे, असे मंत्री सावकरे यांनी नमूद केले.
महाराष्ट्र हे देशाचे अग्रगण्य आर्थिक व औद्योगिक केंद्र असून ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक मोबिलिटी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रगत अभियांत्रिकी, रसायने, जीवन विज्ञान, स्वच्छ ऊर्जा, लॉजिस्टिक्स, कृषी आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांत मोठी क्षमता आहे. ‘महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिट’दरम्यान झालेल्या सामंजस्य करारांमधून सहा प्रमुख क्षेत्रांत गुंतवणूक येत असून २ लाख ९१ हजार नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे.
यावेळी भारतातील जपानचे राजदूत केइची ओनो, निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिक्का, जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशनच्या इक्विटी फायनान्स समूहाच्या जागतिक प्रमुख व वरिष्ठ कार्यकारी व्यवस्थापकीय अधिकारी काझुको साकुमा, टोयो इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक ताकाशी कावाहारा उपस्थित होते.