
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात, हे अभियान अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागांच्या या कामगिरीचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रशासकीय यंत्रणांनी शहापूर, मुरबाड आणि भिवंडी या ग्रामीण व आदिवासी भागांतील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी घोंगडी बैठकांच्या माध्यमातून थेट पाड्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला. माहितीअभावी किंवा कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे कोणताही गरजू नागरिक लाभापासून वंचित राहू नये, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सौजन्याने आणि आत्मियतेने कार्य केले, असे सांगून ते पुढे म्हणाले की, हे अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीतून प्रेरणा घेऊन राबवण्यात आले होते. देशसेवेचा हा संकल्प केवळ एका अभियानापुरता मर्यादित न ठेवता ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणून पुढेही सुरू ठेवली जाणार आहे.

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना दिलासा देणे हाच शासनाचा मुख्य उद्देश असून, दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे. याच वेळी त्यांनी शहरी भागातील नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनीदेखील या काळात मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध भागांमधून आलेल्या लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभही देण्यात आला. यामध्ये विशेष बाब म्हणजे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (DMFT) मार्फत आदिवासी आश्रमशाळेतील आठवी ते दहावीच्या मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार रविंद्र फाटक, बदलापूर नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्यासह विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख उपस्थित होते.