
त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक धोरणात्मक व अन्य सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ॲस्ट्राझेनेकाफार्मा इंडिया लिमिटेडच्या गोरेगाव येथील मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताने जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले असून, अमेरिका आणि युरोपसारख्या कडक नियमन असलेल्या बाजारपेठांमध्येही भारतीय जेनेरिक औषधांची मोठी मागणी आहे. भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि क्षमता यामुळे सिद्ध झाली आहे. आता या क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेष वाढविण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात उभारण्यात येणारा बल्क ड्रग पार्क महत्त्वाचा ठरणार असून, त्यातून औषधनिर्मिती क्षेत्रात व्यापक बदल घडतील, असे त्यांनी नमूद केले.

ॲस्ट्राझेनेकाने कोविड-१९ महामारीच्या काळात केलेले योगदान भारत कधीही विसरणार नाही. कोविशिल्ड लसीमुळे देशातील नागरिकांना मोठा आधार मिळाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘लस मैत्री’ उपक्रमांतर्गत भारताने ९९ देशांना कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला. या माध्यमातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीय संस्कृतीची भावना जगासमोर प्रत्यक्षात आली. या कार्यात ॲस्ट्राझेनेकाचे योगदान महत्वपूर्ण होते, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी आमदार अतुल भातखळकर, ॲस्ट्राझेनेका कंपनीचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली, एशियाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.