
संवाद साधतांना विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचे आणि जिज्ञासेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. शाळेतील संगणक प्रयोगशाळेत सुरू असलेले आधुनिक स्वरूपाचे काम पाहून समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केवळ आपल्या अधिकारांची जाणीव असून चालत नाही, तर त्या अधिकारांसोबत असलेल्या कर्तव्यांचे पालन करणेही तितकेच महत्वाचे आहे. अधिकार आणि कर्तव्ये यांची योग्य सांगड घातल्यासच आपण खऱ्या अर्थाने सुजाण नागरिक बनू शकतो.

विद्यार्थ्यांनी शहरातील खेळाची मैदाने, उद्याने आणि सायकल चालविण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी खेळाच्या मैदानांचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबईत अधिकाधिक मैदाने खेळण्यासाठी खुली करणे तसेच त्याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि चांगली उद्याने विकसित करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सायकल चालविण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावेत, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. त्यावर, मुंबईतही काही ठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आले असून आणखी काही ठिकाणी असे मार्ग विकसित करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या संवादादरम्यान इयत्ता सहावी मधील मयुरा देशमुख, रेवांश अण्णम, अभय पांचाळ, समर्थ कांबळे, त्रिशा जाधव या विद्यार्थ्यांनी शहरातील सुविधा, नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी प्रश्न विचारले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांना देशात आणि जगात घडणाऱ्या घटनांची माहिती असून ते विविध विषयांचा विचार करतात, याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.